Thursday, July 14, 2011

शेवटची ताकीद...

प्रत्येक वेळेस चित्कार ऐकून जमणार नाही,
प्रत्येक वेळेस धिक्कार करून जमणार नाही,
मेणबत्त्या जाळून विझुन जातात,
उकळलेले रुधीर थिजुन जातात,
प्रत्येक वेळेस रक्तात भिजुन चालणार नाही,
प्रत्येक वेळेस अश्रू गाळून निभणार नाही,
आपल्यातलेच कोणीतरी फितुर होतात,
थोड्याश्या स्वार्थासाठी बेईमान होतात,
अशा "खोपड्यांना" शासन जोपर्यंत पोळणार नाही,
तोपर्यंत भारतवासीयांना शांत निद्रा मिळणार नाही,
भाबडेपणाचे, अहिंसेचे पांघरूण बस झाले,
असा अर्थ कोणी घ्याया नको "नपुंसक" झाले,
आपला इतिहास विसरून भागणार नाही,
अशाने भविष्यात भारत तगणार नाही,
शेवटची संधी देतो काहीतरी करा,
नाहींत घरी जाऊन बांगड्या भरा,
तुमच्यावर विश्वास ठेऊन काम होणार नाही,
आम्ही मैदानात उतरल्याशिवाय हे संपणार नाही !!
 
इति शुभम् ||
                              वियुष साकरकार