Monday, January 12, 2015

असंच अस्ताव्यस्त...

आयुष्य हे "रिकामे" आणि "अर्थहीन" आहे. आपण जे आयुष्यात भरतो ते दिसते आणि जो अर्थ देतो तसे भासते !!!

प्रेमाचा अंकुर अविनाशी आहे आणि द्वेषाचा अंकुर विनाशी.

माणुस आयुष्यात सर्वात जास्त एकाच गोष्टीवर प्रेम करतो - त्याचा जीव. ते कळत असो वा नकळत.

आयुष्य जगण्याची सगळ्यात खालची पातळी म्हणजे आयुष्य "कारणांसह" जगणे, आणि उच्चतम पातळी म्हणजे आयुष्याला "कारण" असणे.





परतलो..


बरच हलक वाटत आहे… खूप दिवसांनी परतलो…  हरवलो होतो कि जगत होतो माहित नाही… बरच घडल, बरच दवडल, बरच खोडल… बरच मिळवलं, बरच गमवलं, बरच कमवलं… खुप विसरलो, खुप घसरलो… खुप सरावलो, खुप सुधरलो.

झेप घेतली आहे…क्षितीजा पलीकडे लक्ष्य आहे… प्रवास लांबचा आहे… सोबत तुमची आहे… भेटूच … !!

Thursday, May 10, 2012

प्रायश्चित्त

आयुष्यात कोणत्याही नात्यात, विचारात, परिस्थितीत निर्णयात कायमची पोकळी निर्माण करणारी गोष्ट म्हणजे "चूक". पोकळी या कारणाने कि, जरी चूक सुधरवली तरी चूक सुधरवण्यामुळे आयुष्यातील वाया गेलेल्या वेळेची पोकळी असो किंवा विचारात चूक गोवल्या गेल्यावर विचारात निर्माण होणारी पोकळी असो. एखाद्या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या तफावतीची पोकळी असो किंवा कोणत्याही नात्यात अनपेक्षित वागण्यामुळे झालेली पोकळी.
चूक हि कधी मुद्दाम केलेली, 'चूक' आहे अशी भासवलेली किंवा नकळत घडलेली असते. ती नेमकी काय आहे हे प्रत्येक व्यक्तींनी व्यक्तीनुरूप बदलवायच. निर्माण झालेल्या पोकळीचे कारण जशी "चूक" असते तशीच ती कोणालाही(स्वतःला किंवा दुसऱ्याला) कळल्यावर वाटणारी भीती सुद्धा असते. आता भीती कशाची? भीती कदाचित स्वतःचा खोटेपणा समोर यायची, कदाचित पात्रता नाही हे लोकाना कळेल याची अशा अनेक मूर्ख विचारांची. मुळात स्वताला शूर समजणारा मनुष्य किती छोट्या भावनांना किंवा विचारणा घाबरू शकतो याच हे उदाहरण.
ही पोकळी भरून काढण्याच सामर्थ्य जरी कशात नसाल तरी ती शक्यतोवर कमी करण्याच सामर्थ्य फक्त "प्रायश्चीत्तामध्ये" असत.

आयुष्यातील क्षण

आयुष्यातील प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग हा आपल्या तळहातावर असलेल्या एका पक्ष्याच्या छोट्या पिसासारखा असतो. वेळेची छोटी जरी झुळूक आली तरी लगेच उडणारा... आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा... ते वाऱ्यावर हिंदोळे घेत आनंदात झुलणार.. आपण त्याकडे बघायचं, तोही क्षण अनुभवायचाच. काही वेळानी ते थोडं उंच उडेल... थोडं अजून उंच.. थोडं अजून.. मग कितीही उद्या मारल्या तरी हातात येणार नाही. उड्या मारण्याची व्यर्थ खटपट. तरी त्यातही आनंद. सोबतच दुःख.... ते सुंदर, मऊ, नाजूक पिसं दूर गेल्याच. तसाच त्याचा विसावा कुठे असेल याचा पण थांगपत्ता नसल्याच. तेही किती मूर्ख, कदाचित क्षितीजच विसावा देईल अश्या अशक्य आशेत मनसोक्त बुडून हुंदडणार...

Thursday, July 14, 2011

शेवटची ताकीद...

प्रत्येक वेळेस चित्कार ऐकून जमणार नाही,
प्रत्येक वेळेस धिक्कार करून जमणार नाही,
मेणबत्त्या जाळून विझुन जातात,
उकळलेले रुधीर थिजुन जातात,
प्रत्येक वेळेस रक्तात भिजुन चालणार नाही,
प्रत्येक वेळेस अश्रू गाळून निभणार नाही,
आपल्यातलेच कोणीतरी फितुर होतात,
थोड्याश्या स्वार्थासाठी बेईमान होतात,
अशा "खोपड्यांना" शासन जोपर्यंत पोळणार नाही,
तोपर्यंत भारतवासीयांना शांत निद्रा मिळणार नाही,
भाबडेपणाचे, अहिंसेचे पांघरूण बस झाले,
असा अर्थ कोणी घ्याया नको "नपुंसक" झाले,
आपला इतिहास विसरून भागणार नाही,
अशाने भविष्यात भारत तगणार नाही,
शेवटची संधी देतो काहीतरी करा,
नाहींत घरी जाऊन बांगड्या भरा,
तुमच्यावर विश्वास ठेऊन काम होणार नाही,
आम्ही मैदानात उतरल्याशिवाय हे संपणार नाही !!
 
इति शुभम् ||
                              वियुष साकरकार