Friday, May 27, 2011

आठवत नाही

सूर्योदय पाहून; सूर्यास्त पाहून किती दिवस झाले;
चिमण्यांची किलबिल; दातांची खिळखिळ ऐकून किती दिवस झाले;
                                         आठवत नाही.
ढोरांच्या खुरांचा, भजनातील टाळांचा नाद ऐकून किती दिवस झाले;
ओल्या मातीचा, देवळातील वातीचा गंध विसरून किती दिवस झाले;
                                        आठवत नाही.
आंगणात बाजीवर झोपून; थंडीत तापावर बसून किती दिवस झाले;
पावसाळ्यात पुरात पोहून; उन्हाळ्यात कांडी खाऊन किती दिवस झाले;
                                        आठवत नाही.
उन्हाळ्यात ऊन लागून; थंडीत गाल उबरून किती दिवस झाले;
पावसाळ्यात चिंब भिजून; गारयातले काटे रुतून किती दिवस झाले;
                                     आठवत नाही.
शेतातली चिंचाबोर तोडून; आंबे-पेरू चोरून किती दिवस झाले;
बाजी वरती वाकुन; काकड आरती ऐकून;  किती दिवस झाले;
                                     आठवत नाही.
आईचा पदर सोडून; वडलांचे बोट सोडून किती दिवस झाले;
आईची हाक ऐकून; वडलांचा धाक ऐकून  किती दिवस झाले;
                                     आठवत नाही.
एक दिवस असा येईल,
आपले मूळ विसरून; अस्तित्व विसरून किती दिवस झाले;
मन मारून; स्वार्थ तारून किती दिवस झाले;
                                    आठवता आठवतच नाही.

1 comment:

  1. रडवत गड्या तु किनई माणसाले!!!!!, आज ८ महीने झाले घरी नाही गेलो राज्या मी, अजुन एक-दिड साल जाने होईनही नाई, त्यात तुया कवितेत निरा पुरी गावातली बोली हाये तेच्याने त अजुनच म्याट झालो,वाह!!!!!!!, मले त गड्या आमच्या उमरीची सय आली गळ्या, आता त सायचे उमरीचे पन शहर झाले!!!!!!!, एक अजुन मी खरेच "मिस" करतो, दिवस भर उन्हाळ्यात वखरवाई झाली जमीन तयार केली की झाकट पड्ल्यावर वीज अन दिवे बी नोको वाटते यार, बाजीवर पालथे झोपले की हवेच्यान तशीच झोप लागते, रातीच्या वख्ती आपले टीन मस्त थंड होतेत, अन संध्याकाळचा बेस्ट आयटम म्हणजे बाज टाकुन पड्ले की दुर अगदी दुर येनारा कुत्र्याईचा भुकायचा आवाज, वापस येत्या ढोरायची चाहुल चुलीवरच्या भाकरीचा खरपुस वास त्याहुनही दुर चमकनारे लाईटं पायले की त तारे पायसाठी वर पन नाई कराव लागत मान!!!!, निव्वळ अंधार, कृत्रिम प्रकाश नाही!!!!, गारवा!!!!! खरच यार वियुष्या अंधार पण हवाहवा वाटतो तो!!!!

    ReplyDelete