Monday, October 20, 2025

 प्रमाण..


आयुष्य हे अनेक गोष्टींच्या "प्रमाणाची" रासायनिक प्रक्रिया आहे. कधी, किती, काय, कोणासोबत, केव्हा व कसे हे अत्यंत महत्वाचे घटक. प्रमाण दोन प्रकारचे एक मात्रा आणि एक पुरावा. दोन्ही तितकेच महत्वाचे. एक प्रमाण दुसऱ्या प्रमाणाचे कारक (कोणत्याही गोष्टीची मात्रा त्यातून येणाऱ्या परिणामाच्या पुराव्याचे कारक). या दोन प्रमाणामध्ये अडकलेला आणि गुरफटलेला "मनुष्य". स्वतः जाळे विणणारा आणि त्यातून बाहेर पडण्याची धडपड करणारा तोच "मनुष्य". या प्रमाणांचा अचूक समतोल साधणारा मनुष्यच "स्थितप्रज्ञ"


प्रमाण (दोन्ही) बोलण्याचे, वागण्याचे, राहण्याचे, बदलण्याचे. करण्याचे, देण्याचे, घेण्याचे, फेडण्याचे. विश्वासाचे, प्रेमाचे, रागाचे. त्यागाचे, कर्तव्याचे, जबाबदारीचे, अधिकाराचे. नकाराचे, होकाराचे, संयमाचे, द्वेषाचे. स्वार्थाचे, परोपकाराचे, यशाचे, अपयशाचे. सुबुद्धीचे, दुर्बुद्धीचे, कीर्तीचे, सन्मानाचे, प्रगतीचे, अधोगतीचे. हसण्याचे, रडण्याचे, चिडण्याचे. गोन्जारण्याचे, खाजवण्याचे, पडण्याचे, पडण्याचे, उठण्याचे, उठवण्याचे, कठोरपणाचे, सौम्यपणाचे. दिसण्याचे, असण्याचे, दाखवण्याचे आणि बघण्याचे. बांधण्याचे, तोडण्याचे, बनवण्याचे, मनवण्याचे. कुरघोडीचे, राजकारणाचे. मेहनतीचे, कृतीचे, स्मृतीचे आणि विस्मृतीचे. सोडण्याचे, धरण्याचे. वेळेचे, संधीचे, उपयोगाचे, उपभोगाचे. समतेचे, विषमतेचे, स्वाभिमानाचे, अहंकाराचे प्रमाणच...

Wednesday, January 29, 2025

तु.. .. 

जीवनाची उमेद तु, जिंकण्याची उमेद तु,

श्कवासाची उणीव तु, कर्तव्याची जाणीव तु,
प्रेमाची आस तु, पुरणपोळीचा घास तु
सत्याचा भास तु,, अस्तित्वाचा आभास तु

पत्नीचा बंध तु, भविष्याचा गंध तु,
अविस्मरणीय सुगंध तु, वागण्याला धरबंध तु
प्रत्येक श्वास तु, अतूट विश्वास तु,
जिव्हाळ्याचा स्पर्श तु, इच्छापूर्ती चा हर्ष तु,

तूच तु, मीच तु.....मीच तु....

Monday, January 12, 2015

असंच अस्ताव्यस्त...

आयुष्य हे "रिकामे" आणि "अर्थहीन" आहे. आपण जे आयुष्यात भरतो ते दिसते आणि जो अर्थ देतो तसे भासते !!!

प्रेमाचा अंकुर अविनाशी आहे आणि द्वेषाचा अंकुर विनाशी.

माणुस आयुष्यात सर्वात जास्त एकाच गोष्टीवर प्रेम करतो - त्याचा जीव. ते कळत असो वा नकळत.

आयुष्य जगण्याची सगळ्यात खालची पातळी म्हणजे आयुष्य "कारणांसह" जगणे, आणि उच्चतम पातळी म्हणजे आयुष्याला "कारण" असणे.





परतलो..


बरच हलक वाटत आहे… खूप दिवसांनी परतलो…  हरवलो होतो कि जगत होतो माहित नाही… बरच घडल, बरच दवडल, बरच खोडल… बरच मिळवलं, बरच गमवलं, बरच कमवलं… खुप विसरलो, खुप घसरलो… खुप सरावलो, खुप सुधरलो.

झेप घेतली आहे…क्षितीजा पलीकडे लक्ष्य आहे… प्रवास लांबचा आहे… सोबत तुमची आहे… भेटूच … !!

Thursday, May 10, 2012

प्रायश्चित्त

आयुष्यात कोणत्याही नात्यात, विचारात, परिस्थितीत निर्णयात कायमची पोकळी निर्माण करणारी गोष्ट म्हणजे "चूक". पोकळी या कारणाने कि, जरी चूक सुधरवली तरी चूक सुधरवण्यामुळे आयुष्यातील वाया गेलेल्या वेळेची पोकळी असो किंवा विचारात चूक गोवल्या गेल्यावर विचारात निर्माण होणारी पोकळी असो. एखाद्या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या तफावतीची पोकळी असो किंवा कोणत्याही नात्यात अनपेक्षित वागण्यामुळे झालेली पोकळी.
चूक हि कधी मुद्दाम केलेली, 'चूक' आहे अशी भासवलेली किंवा नकळत घडलेली असते. ती नेमकी काय आहे हे प्रत्येक व्यक्तींनी व्यक्तीनुरूप बदलवायच. निर्माण झालेल्या पोकळीचे कारण जशी "चूक" असते तशीच ती कोणालाही(स्वतःला किंवा दुसऱ्याला) कळल्यावर वाटणारी भीती सुद्धा असते. आता भीती कशाची? भीती कदाचित स्वतःचा खोटेपणा समोर यायची, कदाचित पात्रता नाही हे लोकाना कळेल याची अशा अनेक मूर्ख विचारांची. मुळात स्वताला शूर समजणारा मनुष्य किती छोट्या भावनांना किंवा विचारणा घाबरू शकतो याच हे उदाहरण.
ही पोकळी भरून काढण्याच सामर्थ्य जरी कशात नसाल तरी ती शक्यतोवर कमी करण्याच सामर्थ्य फक्त "प्रायश्चीत्तामध्ये" असत.