Thursday, July 14, 2011

शेवटची ताकीद...

प्रत्येक वेळेस चित्कार ऐकून जमणार नाही,
प्रत्येक वेळेस धिक्कार करून जमणार नाही,
मेणबत्त्या जाळून विझुन जातात,
उकळलेले रुधीर थिजुन जातात,
प्रत्येक वेळेस रक्तात भिजुन चालणार नाही,
प्रत्येक वेळेस अश्रू गाळून निभणार नाही,
आपल्यातलेच कोणीतरी फितुर होतात,
थोड्याश्या स्वार्थासाठी बेईमान होतात,
अशा "खोपड्यांना" शासन जोपर्यंत पोळणार नाही,
तोपर्यंत भारतवासीयांना शांत निद्रा मिळणार नाही,
भाबडेपणाचे, अहिंसेचे पांघरूण बस झाले,
असा अर्थ कोणी घ्याया नको "नपुंसक" झाले,
आपला इतिहास विसरून भागणार नाही,
अशाने भविष्यात भारत तगणार नाही,
शेवटची संधी देतो काहीतरी करा,
नाहींत घरी जाऊन बांगड्या भरा,
तुमच्यावर विश्वास ठेऊन काम होणार नाही,
आम्ही मैदानात उतरल्याशिवाय हे संपणार नाही !!
 
इति शुभम् ||
                              वियुष साकरकार

Friday, May 27, 2011

आठवत नाही

सूर्योदय पाहून; सूर्यास्त पाहून किती दिवस झाले;
चिमण्यांची किलबिल; दातांची खिळखिळ ऐकून किती दिवस झाले;
                                         आठवत नाही.
ढोरांच्या खुरांचा, भजनातील टाळांचा नाद ऐकून किती दिवस झाले;
ओल्या मातीचा, देवळातील वातीचा गंध विसरून किती दिवस झाले;
                                        आठवत नाही.
आंगणात बाजीवर झोपून; थंडीत तापावर बसून किती दिवस झाले;
पावसाळ्यात पुरात पोहून; उन्हाळ्यात कांडी खाऊन किती दिवस झाले;
                                        आठवत नाही.
उन्हाळ्यात ऊन लागून; थंडीत गाल उबरून किती दिवस झाले;
पावसाळ्यात चिंब भिजून; गारयातले काटे रुतून किती दिवस झाले;
                                     आठवत नाही.
शेतातली चिंचाबोर तोडून; आंबे-पेरू चोरून किती दिवस झाले;
बाजी वरती वाकुन; काकड आरती ऐकून;  किती दिवस झाले;
                                     आठवत नाही.
आईचा पदर सोडून; वडलांचे बोट सोडून किती दिवस झाले;
आईची हाक ऐकून; वडलांचा धाक ऐकून  किती दिवस झाले;
                                     आठवत नाही.
एक दिवस असा येईल,
आपले मूळ विसरून; अस्तित्व विसरून किती दिवस झाले;
मन मारून; स्वार्थ तारून किती दिवस झाले;
                                    आठवता आठवतच नाही.

Monday, March 21, 2011

मैत्री

मैत्री ढगांसारखी असावी. कुठेही हुंदडणारी पण मुळ गुणधर्म न सोडणारी. त्याच गुणधर्माचे सर्व मित्र जमा करणारी; त्यांच्या चुकीच्या गुंधार्मासाहित. ढगा सारखे, विराल्यावरही, प्रसन्नता पसरवणारी, चैतन्य फुलवणारी, आनंद देणारी. समृद्ध असणारी आणि समृद्ध बनवणारी. प्रसंगी तेवढीच तेजस्वी, प्रखर, गंभीर आणि भीतीदायक वाटणारी. आपल्या मैत्रीची गडद छाया पाडणारी. मऊ, प्रसंगी दाट, कोणालाही आतलं न दिसू देणारी व प्रसंगी तेवढीच विलोभनीय असणारी. प्रसंगी आपल अस्तित्वच न दिसू देणारी पण अस्तित्वात असणारी. उंच, चेडता न येणारी. कधीही कितीही प्रयत्न केले तरी विलग न होणारी. वादळात विखुरल्यावर हि काही काळानी तेवढ्याच आपुलकीनी, ओढीने, जोशाने जवळ येणारी. सूर्याची तीव्रता स्वतः झेलून सावली देणारी.

Friday, March 18, 2011

पुनरुत्थानाची दिशा

जगाच्या एका टोकावर, स्तब्द बसुनी बघावे
छिन्न भिन्न मानवतेच्या, लक्तरांचे देखावे
आक्रंदणाऱ्या झोंबणाऱ्या, वेदनांचे विसावे
रक्तरंजित इतिहासाच्या, आक्रोशाचे पुरावे
 
तेजोमय अशा अस्मितेचे, काटे असे रुतावे
उमजुनी अस्तित्वाचे धोके, नपुंसकतेचे कोश फेकावे
घनदाट हिरव्या किंकीरात, वणवे जसे पेटावे
अंधारमय असे विश्व, झळाळून तसे काढावे
 
ठासुनी चैतन्याचा प्रवाह, धमन्यांनी काठोकाठ फुगावे
मरगळलेल्या शूरवीरांनी , खडबडून ताठ उठावे
नवनिर्माणाचे लक्ष घेऊन, पुनरुत्थानासाठी कसावे
ऐसे सार्थ करावे कि, दुःखी कोणी नसावे
                          
                                             - वियुष साकरकार

Thursday, March 17, 2011

वाटते असे करावे..

वाटते;
जगाच्या या वाटेवर, नित्य असावे असे
माधवाच्या मुकुटावर, पिस असावे जसे.
वाटते;
आक्रोश या जगताचा, सामावून घ्यावा मनात
गंध त्या कारुण्याचा,  विरून जावा क्षणात
वाटते;
सागराएवढा संयम वाटून, वाऱ्यामध्ये प्रेम भरून
काम,क्रोध,मत्सर मारून, टाकावे दुःख सारून.
वाटते;
विश्वासघाताचा,द्वेषाचा, अंश नुरावा काही
प्रेमाशिवाय न कोणाचा, स्पर्श अंतरी राही.
वाटते;
प्रार्थावे त्या ईश्वरास, हेच मागण्यासाठी
घालवू दे हे जीवन, फक्त मानव सेवेसाठी.
                          - वियुष साकरकार