Friday, February 11, 2011

थोडं तिरपं-तारप

माणूस कोणत्याही गोष्टी शिवाय राहू शकतो पण एका गोष्टी शिवाय नाही आणि ती म्हणजे "सवय". बऱ्याच गोष्टीची माणूस सवय करून घेतो किंवा न कळत होते. माणसांची, खाण्याची, पिण्याची, रडण्याची, मरण्याची.....वगैरे. सवयी सारखी प्रेमळ, घातक आणि तितकीच चवदार गोष्ट दुसरी अशक्यच !!

निर्जीव आणि सजीव वस्तूंमध्ये मला असं वाटते दोनच फरक आहे; सजीव बोलू शकतात, निर्जीव नाही आणि निर्जीव सगळ्यांवरच प्रेम करतात; सजीव नाही. प्रत्येक सजीवाचा जन्म प्रेमातूनच होतो. मग तो मनुष्य असो किंवा प्राणी असो. पण वर्चस्व किंवा ताकद या कारणांमुळे तो आयुष्यभर आपल्या जन्माच्या मुळाला समांतर चालतो. कधी छेदतच नाही.

माणसाची फारच क्षुल्लक पण सगळ्यात जास्त त्रास देणारी इच्छा म्हणजे स्वतःला ऐकून घेण्याची. प्रत्येक समोरच्या माणसात प्रत्येक माणूस एकच गोष्ट शोधत असतो 'त्याला ऐकून घेणारी, सहन करणार व्यक्ती.'

हिरा हा कृत्रिम आहे आणि मोती हा नैसर्गिक. मोती हा मुळातच सुंदर, निसर्ग निर्मित, धीरगंभीर,  शांत  आणि  तेवढाच आकर्षक. विरक्त, दृढ़निश्चयी पण नेहमीच एकाकी आणि बंदिस्त. पण हिऱ्याला तासल जात. पैलू पडले जातात, त्यावर मेहनत घेतली जाते आणि मग तो हिरा बनतो. मुळात तो दगडच असतो तोही काळा.

No comments:

Post a Comment