Monday, February 14, 2011

आठवणी

आयुष्यातल्या किती आठवणी सूर्यफुलाच्या बियांसारख्या गोड असतात. त्या बियांची टरफले काढून आतला गर खायचा असतो. तसे पाहिले तर जीवन सुद्धा सूर्यफुला प्रमाणे आहे, सूर्याच्या कलेप्रमाणे जसे सुर्यफुल रुख बदलते तसेच मनुष्याचे जीवन काळाच्या वेधाने रुख बदलणारे. प्रत्येक आठवणीतील गोडपणा तसा वेगळाच आणि काही आठवणी काही बियांसारख्या कडू; थुन्कल्यावरही कडूपणाची चव सोडून जाणाऱ्या. प्रत्येक आठवणीत एक पोकळी; कधीच न भरून निघणारी. काळाच्या ओघात काही बिया वाऱ्या-वादळांनी खाली पडतात तर काही अजून दृढ बनतात; तसेच आठवणींचे. काही सुर्यफुल लहानपणीच कोमेजतात तर काही भरधाव वेगानी सर्वांच्या पुढे जाऊन स्वतःला जास्त भरतात; तसेच प्रत्येकाच्या आयुष्याचे. काही बालपणीच्या आठवणी जश्या गहाळ होतात, लक्षात राहातच नाहीत, कधी आठवतच नाहीत तशी सूर्यफुलाच्या मध्याशी असलेली रिकामिजागी, कितीही इच्छा असली तरी कधी न भरणारी. एका गुणधर्माची पण त्याच प्रमाणे दुबळेपणाची जाणीव करून देणारी. जीवनाचा गाभारच पोकळ असल्याची सतत जाणीव करून देणारी. आणि एखाद सुर्यफुल, कितीही खाली दबलं तरी सूर्यप्रकाशात येण्याची आकांक्षा असणारं, कदाचित नेहमी असफल प्रयत्न करणारं......

No comments:

Post a Comment