Monday, February 14, 2011

अडचण

माणसाला स्वतःच्या आयुष्याबद्दलही जरी काही करायचे असले तरीही 'कोणाला काय वाटेल?' हा विचार  मनात  आल्याशिवाय तो ते करू शकत नाही. आणि त्यामुळेच कित्येकदा जरी वाटत असले कि आयुष्यातला कोणताही बरा वाईट क्षण लिहावा, काहीतरी कराव; पण ते शक्यच होत नाही, लिहिल्या/ केल्या जातच नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या काही व्यक्तींशी निगडीत असतात, काही गैरसमाजांनी गोवल्या गेलेले असतात. आपल्याला झालेला समज आहे कि गैरसमज हे सुद्धा सांगण्या इतपत हिम्मत नसलेला प्राणी म्हणजे 'माणुस' होय. कारण तो समज आहे की गैरसमज; बरोबर आहे की चुक याची त्याला स्वतःला सुद्धा योग्य प्रकारे जाणीव झालेली नसते.
               गलितगात्र होऊन स्वतःच्या विचारांशी स्वतःच लढून नामशेष होणे हेच मनुष्याच्या जीवनाचा आखून दिलेला मार्ग असतो. आखून दिलेल्या चाकोरीच्या बाहेर जाण्याचा कमी अधिक प्रमाणात सर्वच जण प्रयत्न करतात आणि चक्रव्युहात फसून 'मेढरांच्या कळपासारख चाकोरीतूनच चला' हा जीवनाचा आशय असल्याचा संदेश देतात. कोणी दुसऱ्या वाटेन जाण्याचा प्रयत्न जरी करत असेल तरी त्याला स्वतःच्या आयुष्यातील आलेल्या अडचणी सांगून, कधी भावनांनी, कधी भौतिक सुखाच आमिष देऊन त कधी लादलेल्या जबाबदार्यांच्या ओझ्या खाली दाबून 'त्याच्या वैयक्तिक किंवा कोणाच्याहि स्वार्थासाठी' त्या चाकोरीच्या बाहेर न जाऊ देण्याचा केविलवाणा प्रकार केल्या जातो. कदाचित त्यांच्या वरही तोच लादण्यात आल्याने किंवा समाजाच्या 'हि' पद्धतच अंगवळणी पडल्याने हे घडत असावे. बदल हा सृष्टीचा नियम आहे तो या प्रकारातच का चुकवा?
             दिवसेंदिवस कोणत्याही नात्यातला भाव हा प्रेमापेक्षा स्वार्थाकडे जास्त कललेला काही काळापासून दिसत असला तरी आता भासायला लागला आहे. शेवटी कोणत्याही अपत्याचा जन्म हा जसा प्रेमातून होतो तसा त्यामागे स्वार्थ (भौतिक आणि मानसिक) हा असतोच. त्यामुळेच कदाचित 'स्वार्थ' प्रत्येकाच्या अंगवळणी पडत असेल व प्रत्येकाला भोगावे लागत असेल. अडाणी, शिक्षित आणि सुशिक्षित यांमध्ये फरक काय तो हाच कि ज्यांच्या दैनंदिन गरजा आणि स्वार्थाची पातळी अनुक्रमे जास्त प्रमाणात वाढत जाते. अर्थात काही अपवाद असतात. अगदी
कोणाकोणात स्वार्थ नसतोच असे नाही.
पण त्या लोकांना अपवादाच्या यादीत जाण्यापासून परावृत्त करण्याचे श्रेय घेण्यासाठी 'हि' काही लोक धडपड करतात; या समाजाच्या चांगल्या अंगाचा हा किती दुर्दैविपणा !

No comments:

Post a Comment